Ad will apear here
Next
रत्नागिरीत हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरू; ‘अचानक’ने झाली नांदी!
‘अचानक’ या नाटकातील एक दृश्य

५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ नोव्हेंबर २०१९पासून रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सुरू झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष राजकिरण दळी, सचिव समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास साळवी यांच्यासह डॉ. शशिकांत चौधरी, गजानन कराळे आणि ज्योती केसकर हे तीन परीक्षक यांच्या उपस्थितीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. ‘अचानक’ या नाटकाने या फेरीची नांदी झाली. त्या नाटकाची ही ओळख...
...........
अनाहूतपणे घरी येऊन मुक्काम ठोकलेल्या पाहुण्यांनी आपली ओळख ‘दहशतवादी’ अशी सांगितली तर काय?... अंगावर काटा येईल ना! बँकेत कॅशिअर असणारा सोहेल आणि त्याचे कुटुंबीय यांचं असंच झालं. 

सोहेल आणि राधा हे आंतरधर्मीय विवाह करून संसार थाटलेलं दाम्पत्य. सरीन ही त्यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी. आंतरधर्मीय विवाह करूनही आपापल्या धर्मश्रद्धा जपत, परस्परांच्या परंपरांचा आदर करणारं हे समाधानी जोडपं एक दिवस अचानक आलेल्या त्या दहशतवादी पाहुण्यांच्या कचाट्यात सापडतं. अब्बास आणि अमीर नावाचे ते दोघे सोहेलवर एक कामगिरी सोपवतात - सर्व जाती-जमातींमध्ये आदराचं स्थान असलेल्या एका ज्येष्ठ धर्मगुरूची हत्या करण्याची. पापभीरू, धर्मनिरपेक्ष नि देशप्रेमी वृत्तीच्या सोहेलला हे मान्य होत नाहीच. 

‘दहशतवाद तुमच्या उंबरठ्यावर’ हे मिशन सुरू करणारा निष्ठुर अब्बास सोहेलच्या कुटुंबावर पद्धतशीर दडपण आणतो. लाखो रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या तिजोरीत ठेवून चलनातल्या नोटा आणायला भाग पाडतो. त्याला पिस्तूल हाताळायला शिकवतो. सोहेलची पत्नी राधा ही मानसशास्त्राची प्राध्यापक. अब्बासच्या शिकवणुकीचा, किंबहुना तो आणत असलेल्या मानसिक दबावाचा परिणाम होऊन सोहेलच्या हातून एखाद्याची हत्या कशा प्रकारे घडू शकते याचं मानसशास्त्रीय विश्लेषण राधा करते. 

अब्बासचा साथीदार अमीर त्यांच्या मुलीला - सरीनला तिच्याच महाविद्यालयात घेऊन जातो. मूलतत्त्ववादी विचारांच्या युवकासोबत तिला पाहिल्यावर महाविद्यालयातील काही युवक तिच्यावर चिखलफेक करतात, ती भेदरून घरी येते. या सगळ्या वातावरणाचा सोहेलवर नकळत परिणाम होऊ लागतो... कदाचित, अब्बासला पाहिजे तसा! 

धर्मगुरूची हत्या अजून दूर आहे. सोहेलला माणूस ठार झालेला पाहायला मिळावा यासाठी अब्बास एक दिवस अनपेक्षितपणे आपल्याच साथीदाराला गोळी घालून ठार करतो. त्याचं प्रेत घरातल्या एका खोलीत ठेवून देतो. अशा भेसूर वातवरणात ते कुटुंब कित्येक तास काढतं. ती परिस्थिती असह्य झाल्यानं, एका क्षणी तिथून निसटून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या तिघांना अब्बास रोखतो आणि सोहेलच्या हातून राधालाच गोळी घातली जाईल अशी परिस्थिती निर्माण करतो. ‘आज या घरात मुडदा पडलाच पाहिजे’ असं अब्बास सांगत असतानाच अचानकपणे मागे वळून सोहेल अब्बासवर गोळ्या झाडून त्याचा खात्मा करतो. 

यानंतरच्या काही क्षणांतच भानावर आलेल्या सोहेलची हातून घडलेल्या कृत्यांबद्दल न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगण्याची तयारी होते. त्याचं देशप्रेम जिवंत आहे या भावनेनं ते त्रिकोणी कुटुंब प्रफुल्लित होतं. 

जांभारी इथल्या श्री भैरीदेव देवस्थानच्या कलाकारांनी हे नाटक सादर केलं. योगेश सोमण यांनी लिहिलेल्या या संहितेला प्रशांत पावरी यांच्या दिग्दर्शनाची साथ मिळाली. सदैव सावध असलेला अमीर, थंड डोक्याचा अब्बास, दडपणाखाली वाहत चाललेला सोहेल आणि भेदरलेली कॉलेजकन्यका सरीन यांच्या भूमिका चांगल्या वठल्या आहेत. स्वाती खापरे या तरुण कलावतीनं मध्यमवयीन राधा सादर करताना भीतीनं उठलेले काहूर, उद्वेग, विश्लेषण करण्याचं भान आणि संकटातही सत्त्व जपण्याची निष्ठा या भावना ताकदीनं पेश केल्या. दहशतवादाला सामोरं जाण्याचा प्रसंग सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब कशा प्रकारे हाताळू शकतं याचं एक प्रात्यक्षिकच ‘अचानक’च्या रूपाने पाहायला मिळतं. 

- राजेंद्रप्रसाद मसुरकर
मोबाइल :
९९६०२ ४५६०१

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZURCG
Similar Posts
‘नांगर’मधून मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न; ‘आता उठवू सारे रान’ ठसठशीत नाटक! ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ नोव्हेंबर २०१९पासून रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सुरू झाली. दुसऱ्या दिवशी ‘नांगर’ आणि ‘आता उठवू सारे रान’ ही दोन नाटके सादर झाली. त्या नाटकांची ही ओळख....
रेस्ट हाउस : न विझणाऱ्या सूडाग्नीचं रहस्यमय कथानक ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतील आठवे नाटक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सादर करण्यात आले. ‘रेस्ट हाउस’ नावाचे हे नाटक नाणीज येथील महाकाली रंगविहार या संस्थेने सादर केले होते. त्याचा हा परिचय...
या व्याकुळ संध्यासमयी... ५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी समारोप झाला. त्या दिवशी सादर झालेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचा हा परिचय...
अननोन फेस - चेहरा बदलून वेदना लपविण्याच्या प्रयत्नांचं कलात्मक सादरीकरण ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तिसऱ्या दिवशी (२० नोव्हेंबर २०१९) सादर झालेल्या ‘अननोन फेस’ या नाटकाचा हा परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language